मुंबई - कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) आज हायकोर्टाची नाराजी व्यक्त केली आहे. इतरांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, थोडीतरी प्रगती दाखवा असं एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं आहे. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी वापरलेलं हत्यार खाडीपात्रातून शोधण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी आवश्यक असल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. दरम्यान, संशयित आरोपी सचिन अंदूरे याने या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावरच गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण संपविण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी आपल्याला ५० लाखांची ऑफर दिल्याची तक्रार अंदूरेने कोर्टात केली आहे.पानसरे हत्याप्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने एसआयटीला चांगलेच फैलावर घेतले. तसेच पानसरे हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपीच्या कोठडीत चार दिवसाने म्हणजेच २० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अन्य संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी या संशयितांना कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. बेळगाव येथील जंगलात या संशयितांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यात आणखी तिघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी हल्लेखोरांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तूल खाडीपात्रातून शोधण्यासाठी आणखी अवधी देण्याची मागणी सीबीआयने कोर्टाला केली. या तपासासाठी आणखी चार आठवड्यांचा अवधी आवश्यक असल्याचे सीबीआयने कोर्टाला सांगितले.
पानसरे हत्याप्रकरण : तपासात थोडीतरी प्रगती दाखवा; एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 8:23 PM
पोलिसाने दिली ५० लाखांची ऑफर; सचिन अंदुरेने कोर्टात केले गंभीर आरोप
ठळक मुद्देहे प्रकरण संपविण्यासाठी तपास अधिकारी अमृत देशमुख यांनी आपल्याला ५० लाखांची ऑफर दिल्याची तक्रार अंदूरेने कोर्टात केली आहे.इतरांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, थोडीतरी प्रगती दाखवा असं एसआयटीला हायकोर्टाने फटकारलं आहे.