बीड : ‘पप्पा, तुम्ही हुंडा दिला नाही, म्हणून हे लोक मला मारत आहेत. खूप त्रास होतोय,’ अशी व्यथा वडिलांच्या गळ्यात पडून सांगितली. वडिलांनी समजावून सांगत ते गावी लातूरला परतले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे १३ मे रोजी घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मेघा निखिल करवे (२२), असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील भरत खज्जे यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी मेघाचा विवाह साळुंकवाडी येथील निखिल करवे याच्यासोबत लावून दिला होता; परंतु सासरच्यांनी मेघाचा छळ सुरू केला. पिकअप व सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी तीन लाख रुपये माहेरहून घेऊन ये, असे म्हणत तिला मारहाण केली. हा प्रकार मेघाने वडिलांना सांगितला. १३ मे रोजी खज्जे हे गावातील काही लोकांना घेऊन मेघाच्या घरी आले. जावई आणि सासरच्या लोकांना समजावून सांगितले; परंतु तरीही सासरच्या लोकांनी तिचा छळ थांबविला नाही. यालाच कंटाळून मेघाने वडील परतताच घरी कोणीही नसल्याची संधी साधून गळफास घेतला.
पप्पा, हुंडा दिला नाही म्हणून खूप मारहाण होते; वडिलांशी बोलून मुलीने घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 14:30 IST