सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाच्या कारणास्तव पेरॉलवर जेल बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कलानी यांच्या राजकीय व सामाजिक भूमिकेवर कमल भतीजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून प्रश्नचिन्हे उभे केले. कलानी लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे भाकित सोशल मीडियावर केल्याने, कलांनीच्या सुटकेबाबत उलटसुलट चर्चेला शहरात उधाण आले.
उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातून यापूर्वी ४ वेळा आमदार पदी निवडून आलेले पप्पू कलानी यांना एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा लागली. दरम्यान धर्मपत्नी व माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन झाल्यावर, कलानी यांना पेरॉलवर सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा ४५ दिवसाचा पेरॉल वाढवून मिळाला. दरम्यान शासनाच्या धोरणानुसार कोरोनाच्या महामारीचे कारण देऊन वयोवृद्ध आरोपीना जेलमधून सुटका देण्यात आली. यामध्ये पप्पु कलानी यांनाही पेरॉल वाढून मिळाला. पप्पू कलानी यांचे शहरात आकर्षण कायम असून गणेशोत्सवानंतर त्यांनी जुने व नवीन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले. तसेच अनेक गणेश मंडळाला भेटी दिल्या. शहर विकासासाठी नागरिकांनी कलानी कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचे साकडे घालण्यास सुरवात करून राजकीय वातावरण कलानीमय केले.
पप्पू कलानी यांची कायमस्वरूपी जेलमधून सुटका झाली नसून ते नेहमी प्रमाणे नागरिकांना शहर विकासाचे स्वप्न दाखवीत आहेत,असा आरोप सोशल मीडियावर भतीजा खून खटल्यातील संबंधित कमल भतीजा यांनी पोस्ट व्हायरल केली. तसेच पप्पू कलानी हे चार तर धर्मपत्नी ज्योती कलानी एकवेळा आमदार राहिल्या आहेत. दोन वेळा नगराध्यक्षपद, दोनदा महापौर पद तर सलग ७ वेळा स्थायी समिती सभापती पद भुसाविणाऱ्या कलानी कुटुंबाने शहराचा कोणता विकास केला?. असा प्रश्न सोशल मीडियावर भतीजा यांनी केल्याने, एकच खळबळ उडाली. कलानी कुटूंबाचे कट्टर समर्थक व नगरसेवक मनोज लासी यांनी अश्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्याचे टाळून, पप्पू कलानी यांचे आकर्षण कायम असल्याचे सांगून शहर काही दिवसात कलानीमय झाल्याची प्रतिक्रिया दिली.