नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा घातला. तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर हे पथक देशमुख यांच्या निवासस्थानातून निघून गेले. त्यानंतर पुन्हा काही वेळाने सीबीआयचे अधिकारी घरी परतले आणि बाहेर गेलेल्या अनिल देशमुखांनाही घरी बोलावून घेतले.
शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५ च्या सुमारास इनोव्हा आणि आर्टिका अशा दोन गाड्यांमधून सीबीआयचे पथक देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवास्थानी दाखल झाले. पीपीई किट घालून असलेल्या या पथकात २ महिलांसह १० अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी देशमुखांना आपली ओळख सांगून चौकशीसाठी आल्याची माहिती दिली. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांसह सहा ते आठ जन नाश्ता करण्याच्या तयारीत होते. त्या सर्वांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी या पथकाने देशमुख यांच्या निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. कपाट लोकर आदींची तपासणी केल्यानंतर काही कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याची पाहणी केल्यानंतर या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांची प्रदीर्घ विचारपूस वजा चौकशी केली.
विशेष म्हणजे, निवासस्थानी पोहचल्यानंतर स्थानिक पोलिसांना सीबीआयकडून साधी सूचनाही देण्यात आली नाही. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत देशमुख यांचे निवास स्थान ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते ते सिताबर्डी पोलीस सुद्धा या कारवाईपासून अनभिज्ञ होते. दरम्यान, देशमुख यांच्या निवासस्थानात पीपीई किट घालून गेलेले सीबीआयचे पथक असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर सीताबर्डीचा पोलिस ताफा देशमुख यांच्या निवासस्थान समोर पोहोचला.
नेमके काय कळेचना!
सीबीआयच्या पथकात नेमके किती आणि कुठले अधिकारी आहे, ते ८ तासांनंतरही स्पष्ट झाले नव्हते. आयजी आणि एडीजी दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह देशमुख यांच्या निवासस्थानी चौकशी करीत असल्याचे सांगितले जात होते.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी
या कारवाईने शहरात एकच खळबळ उडवून दिली. दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जितेंद्र तिवारी आणि महिला नेत्या नूतन रेवतकर आपल्या कार्यकर्त्यांसह देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आल्या. त्यांनी येथे सीबीआयच्या कारवाईचा जोरदार निषेध नोंदविला. केंद्र सरकार आणि अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आणि राज्यात सत्तेवर येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील लोकांच्या मदतीने कट कारस्थान करून सीबीआयची कारवाई करून घेतल्याचा आरोप या नेत्यांनी केला. सुमारे वीस मिनिटे त्यांनी येथे घोषणाबाजी केल्यानंतर सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस द्वितीय निरीक्षक काचोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
उलट-सुलट चर्चा
देशमुख यांच्या निवासस्थानाच्या आतमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे निवासस्थानाच्या समोर असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहित नव्हते.मात्र दिल्ली, मुंबईचा हवाला देऊन काही वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळे वृत्त दिल्यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. किट घातलेला एक अधिकारी बाहेर आला. त्याने त्यांच्या एका कार मधून कागदपत्रांचा गठ्ठा तर दुसऱ्या कारमधून अन्य साहित्य बाहेर काढले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद न देता हा अधिकारी पाच मिनिटात बाहेरून आतमध्ये गेला.
सोशल मीडियाचा गोंधळ
सोशल मीडियावर देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला, त्यांना ताब्यात घेतले, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली, असे उलट-सुलट मेसेज वायरल होत होते. मात्र सीबीआयचे पथक देशमुखांच्या निवासस्थानातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी सोबत नेलेल्या कागदपत्राचा गठ्ठा आणि एक प्रिंटर तसेच त्यांचे लॅपटॉप होते. सीबीआयचे अधिकारी सायंकाळी बाहेर येताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला आणि काही प्रश्न केले. मात्र कोणतीही कॉमेंट न करता हे पथक तेथून निघून गेले.
काय म्हणाले अनिल देशमुख?
देशमुख यांची प्रतिक्रिया सीबीआयचे पथक सर्चींग साठी आमच्याकडे आले होते. त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य केले. आता मी माझ्या काटोल मतदार संघात कोविडची रुग्णांची स्थिती कशी आहे, ते बघण्यासाठी दौऱ्यावर जात आहे, अशी मोजकी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली. पत्रकारांच्या प्रश्नावर बोलण्याचे त्यांनी टाळले.