मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सोमवारी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या खंडणीच्या दोन गुन्ह्यांसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.सीआयडीने जारी केलेल्या नोटीसनंतर सिंग दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील बेलापूर येथील कार्यालयात पोहोचले. सिंग यांच्याविरुद्ध दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे आणि ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास सीआयडी ही एजन्सी करत आहे.सीआयडीने यापूर्वी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली होती. नुकतेच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्या आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले. सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने या वर्षी मार्चमध्ये न्यायमूर्ती के यू चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती.पॅनेलने यापूर्वी सिंग यांना आयोगासमोर हजर न राहिल्याबद्दल अनेक वेळा दंड ठोठावला होता आणि त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. सिंग यांना यापूर्वी खंडणीच्या एका खटल्यात न्यायालयाने फरार घोषित केले होते, चंदीगडहून परतल्यानंतर सहा महिन्यांनी गेल्या गुरुवारी सिंग मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ च्या कार्यालयात हजर झाले आणि त्यांनी जबाब नोंदवला.सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे.शुक्रवारी सिंग एका स्थानिक बिल्डरच्या तक्रारीवरून त्यांच्या आणि इतर काही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात ठाणे पोलिसांसमोर हजर झाले. परमबीर सिंग या आयपीएस अधिकाऱ्यावर महाराष्ट्रात किमान पाच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
परमबीर सिंग सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर झाले हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:30 PM