मुंबई-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील वसुलीच्या आरोपप्रकरणी (Parambir Singh Extortion Case) एक मोठा खुलासा झाला आहे. परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयज पुनमिया यानं उद्योगपती श्याम सुंदर अग्रवाल यांना जाळ्यात ओढण्यासाठी एका खास सॉप्टवेअरच्या मदतीनं अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील (Chhota Shakeel) याच्या आवाजात बनावट फोन कॉल केला होता, अशी माहिती सीआयडीनं केलेल्या चौकशीत समोर आली आहे.
एका सॉफ्टवेअरच्या मदतीनं छोटा शकीलचा आवाज काढून फोनकॉलवर खंडणी मागितली जात होती. कॉल खरा वाटावा यासाठी व्हीपीएनचा वापर केला गेला. इतकंच नव्हे, तर कुणालाही याचा थांगपत्ता लागू नये यासाठी पुनमिया यांनी सायबर एक्स्पर्टची देखील मदत घेते होते.
लवकरच या प्रकरणात चार्जशीट दाखल केली जाणार आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून सुरू असून याप्रकरणात आता सायबर एक्स्पर्टचे जबाब देखील नोंदविण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत आरोपी आणि संशयितांकडून सायबर एक्स्पर्टना हाताशी धरून छोटा शकीलच्या नावानं आणि त्याचा आवाज काढून वसुलीचा खेळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं याप्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.
व्यापाऱ्याला छोटा शकीलचा निकटवर्तीय भासवण्याचं षडयंत्रसीआयडीच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपनं फोन कॉलमध्ये आवाज छोटा शकील याच्या आवाजाशी मिळताजुळता वाटावा यासाठी एका खास सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली होती. अग्रवाल यांच्या वतीनं पुनमिया यांना हा फोनकॉल करण्यात आल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात होता. अग्रवालचे छोटा शकील याच्याशी जवळचे संबंध असल्याचं सिद्ध करण्यासाठी असं केलं जात होतं.
व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखलश्याम सुंदर अग्रवाल यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह, संयज पुनमिया, बिल्डर सुनील जैन, दोन एसीपी रँक अधिकारी, एक डीसीपी आणि दोन पोलीस निरीक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलिसांनी पुनमिया आणि जैन यांना अटक देखील केली होती. संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आलं. सीआयडीनं यानंतर याच प्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांनाही अटक केली होती.
५० लाखांच्या वसुलीसाठी परमबीर सिंह यांची धमकीव्यापारी श्याम सुंदर अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंह आणि त्यांचे लोक मकोका अंतर्गत अडकविण्याचं षडयंत्र रचत होते. यातून बचावासाठी ५० लाख रुपयांची खंडणी आणि प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी दबाव टाकला होता, असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे. अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंह यांची बदल करण्यात आल्यानंतर अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांकडेही परमबीर सिंह यांची तक्रार केली होती.