ठाणे : तब्बल साडेतीन कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाणेनगर पोलिसांनी तारिक अब्दुल करीम मर्चंट उर्फ तारिक परवीन (५५, रा. मुंबई) या आणखी एका आरोपीला तळोजा कारागृहातून अटक केली आहे. मुंबई- ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ आरोपींविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परवीन याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ३० जुलै २०२१ रोजी याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आदी अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. परमबीर यांच्याच आदेशाने शर्मा आणि कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन साडे तीन कोटी रु पये उकळल्याचा गंभीर आरोप जालान आणि तन्ना यांनी केला होता.
यामध्ये आतापर्यंत संजय पुनामिया यालाच अटक झाली आहे. तर मुंबई पोलिसांनी एका गुन्हयात अटक केलेल्या परवीन याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याला आता तळोजा कारागृहातून १७ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. ठाणे न्यायालयाने त्याला शनिवारी २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परवीनच्या अटकेमुळे यातील आरोपींची संख्या दोन झाली आहे.