वारंवार समन्स बजावूनही हजर न झाल्याने चांदिवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. परमबीर हे आता मुंबईत आले असल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा न्या. चांदिवाल यांनी काल दिला होता. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर होणार असून अनिल देशमुख मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर हजर होणार असल्याची माहिती आयोगाला दिली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी चौकशी आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. सध्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची उलटतपासणी सुरू आहे. गेले सात महिने अज्ञातवासात गेलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अखेर गुरुवारी मुंबईत प्रगटले. गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेल्या सिंग यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. एकेकाळी परमबीर हे ज्यांचे प्रमुख होते, त्याच पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन आपली साक्ष नोंदवण्याची नामुष्की आली.
गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात गुन्हे शाखेने विशेष एनआयए न्यायालयाकडून परवानगी घेत तळोजा कारागृहातून वाझे याचा ताबा घेत अटक केली होती. गोरेगाव येथील दाखल खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर फरारची नोटीसही चिकटवली होती.