लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्याने नाराज झालेल्या परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्याचबरोबर त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) व सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर (ईडी) पोहोचविले.
परमबीर सिंह यांनी २० मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या पत्रानुसार कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचे युनिट हेड होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावले आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले.
देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत व त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल, असे या पत्रात नमूद केले होते. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात निर्देश द्यायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हे आरोप केले होते.
देशमुखांचा राजीनामा ते पुन्हा प्रकटणे...१८ मार्च : ‘लोकमत’च्या इयर ऑफ द महाराष्ट्रीयन पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वामध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची बदली केल्याचे वक्तव्य२० मार्च : परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.५ एप्रिल : देशमुखांचा राजीनामा.१० मे : ईडीने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरुद्ध ईसी आयआर दाखल केला.२६ जून : ईडीचे पहिले समन्स२९ जून : ईडीचे दुसरे समन्स ५ जुलै : ईडीचे तिसरे समन्स १६ जुलै : ईडीचे चौथे समन्स.१७ ऑगस्ट : ईडीचे पाचवे समन्स.२ सप्टेंबर : देशमुख यांची समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात२९ ऑक्टोबर : समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली.१ नोव्हेंबर : देशमुख ईडीच्या कार्यालयात स्वतःहून हजर.