परभणी : गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी शिवारातून एका महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरास शोधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे ६ जुलै रोजी महिलेचे मंगळसूत्रही परत करण्यात आले.
चिंचटाकळी येथील शेतमजूर बबनराव नारायणराव मोरे हे त्यांच्या कुटुंबियांसह आखाड्यावर झोपले असताना २६ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चार चोरटे आखाड्यावर आले. चाकूचा धाक दाखवून या चोरट्यांनी बबनराव मोरे यांच्या पत्नीस मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दोन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले. तसेच ज्वारीच्या कोठीत ठेवलेले १ हजार रुपयेही लांबविले होते. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात २७ आॅक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी, पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. या प्रकरणाचा तपास करीत असताना मिळालेल्या माहितीवरुन २ जुलै रोजी आरोपी बापु रमेश काळे व मसाजी तुकाराम धोत्रे (३५, रा.महातपुरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातून नगदी ५०० रुपये, १ हजार ३०० रुपयांचे मंगळसूत्र व ३ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे १० मनी असा ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
न्यायालयाच्या आदेशानुसार चोरी गेलेला हा ऐवज फिर्यादी बबनराव मुळे यांना सुपूर्द करण्यात आला. पोलीस निरीक्षक सोहन माछरे, उपनिरीक्षक रवि मुंडे, सहाय्यक उपनिरीक्षक मैनोद्दीन पठाण, हवालदार साहेब मानेबोईनवाड, सुग्रीव कांदे, गणेश वाघ, रवि कटारे यांनी ही कामगिरी केली.