नाशिक : म्हसरूळ शिवारातील चामरलेणी येथे फिरायला गेलेल्या पंचवटीतीलचौघा जॉगर्सला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने पाच आयफोन मोबाइल असा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेणाऱ्या टोळीचा म्हसरूळ पोलिसांना अवघ्या 24 तासांत छडा लावून बेड्या ठोकल्या. दोन दिवसांपूर्वी नवीन आडगाव नाका विजयनगर कॉलनीत राहणारा फिर्यादी ब्रज अक्षय शहा व त्याचे अन्य तीन मित्र रविवारी दुपारी चामरलेणी येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथे डोंगराच्या पायथ्याशी फोटोसेशन करत असताना तेथे संशयित लुटारूंची टोळी आली.
टोळीतील एकाने हस्तीदंताचे गळ्यात लॉकेट घातलेल गुन्हेगाराने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट तसेच पाच आयफोन व पंधराशे रुपये रोख असा 2 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हे शोध पथकाला संशयितांचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर काही वेळाने ढोकणे यांना गुप्त बातमीदारामार्फत लूट करणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली तसेच घटनास्थळी पोलिसांना हॉटेलातून आणलेल्या जेवणाचे पार्सलचे बांधणीचे वेष्टणही (रॅपर) मिळाले. त्यावरुन पोलिसांनी त्या हॉटेलचा शोध घेतला. हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात एक संशयिताचे वर्णन मिळाले. पोलिसांनी पाळत ठेऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला मात्र त्यास संशय आल्याने तो घराजवळून निसटून गेला. त्यावरून या गुन्ह्यातील संशयित निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित संदीप सुधाकर पगारे, आनंद रघुनाथ जाधव (दोघे रा, फुलेनगर) सुनील गायकवाड (रा. औरंगाबादरोड), रवी कचरू निकम (रा.ओमनगर, मेहरधाम) यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. माळी, गणेश रेहरे, मयूर पवार, संजय पवार यांच्या पथकाला या संशयितांच्या मुसक्या बांधण्यात यश आले. इन्फो बॉक्स खंडणीच्या गुन्ह्यातील फिर्यादी निघाला संशयित आरोपी जबरी चोरीच्या प्रकरणात म्हसरूळ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांपैकी संदीप पगारे हा पंचवटी पोलिसांकडे दाखल असलेल्या एका खंडणी वसुलीच्या गुन्ह्यातील फिर्यादी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पगारे हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले. याने आपण भाजीपाला विक्री व्यवसाय करत असून व्यवसाय करण्यासाठी संशयित विशाल भालेराव व त्याच्या साथीदारांनी पन्नास हजार रुपये खंडणी मागितली अशी तक्रार काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन दिली होती. आता त्याने दिलेली तक्रार खरी की खोटी याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.