गोरेगाव/कडोळी (जि.हिंगोली) : छेड काढण्याची तक्रार शिक्षकाकडे केली म्हणून विद्यार्थिनीच्या गालात सूरज इंगळे याने चापटा मारल्या. याप्रकरणी तक्रार करू नका म्हणून विद्यार्थिनीच्या पालकांना या रोडरोमिओच्या आई-वडिलांनी धमकावले. ही घटना सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील रमतेराम महाराज विद्यालयात १७ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून सूरज इंगळेसह त्याच्या आई-वडिलांवर गोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
रमतेराम महाराज विद्यालयामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या माझोड येथील विद्यार्थिनींची काही टवाळखोर नेहमीच छेड काढतात. सततच्या छेडछाडीला कंटाळून माझोड येथील काही विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षकाकडे तक्रार केली. त्यामुळे सूरज इंगळे (रा.कडोळी) याने चक्क शाळेत जाऊन माझ्या भावाची आणि मित्राची शिक्षकाकडे तक्रार का केली, असे म्हणत एका विद्यार्थिनीच्या गालावर चापटा मारल्या.
यानंतर विद्यार्थिनींचे पालक शाळेत आले. याबाबत तक्रार करू नका नाही तर, आमची मुले नेहमी त्रास देतील त्यामुळे तुमच्या मुलीची बदनामी होईल अशी धमकी त्या रोड रोमिओंच्या आई-वडिलाने विद्यार्थिनींच्या पालकांना दिली. याप्रकरणी माहिती मिळताच गोरेगाव ठाण्याचे पोनि. विश्वनाथ झुंजारे, पीएसआय गजानन पाटील आदींनी शाळेला भेट दिली. याप्रकरणी सूरज सोपान इंगळे, आकाश भानुदास इंगळे, संदेश सोपान इंगळे आणि इतर काही जणांसह धमकी देणारे त्यांच्या आई वडिलांवरही गुन्हा दाखल झाला आहे.