मुंबई: स्वतःच्या फायद्यासाठी एका बाळाची (१ वर्ष ७ महिने ) विक्री एका समलिंगी जोडप्याला करणाऱ्या आई-वडिलांसह सहा जणांना डी एन नगर पोलिसांनी अटक केली. त्यात एका तृतीपंथीचाही समावेश असून बाळाची सुखरूप सुटका करण्यातही त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे नजमीन शेख (बाळाची आई), तिचा पती मोहम्मद आझाद शेख उर्फ बादशाह, एजंट सकीनाबांनो शेख, राबिया परवीन अन्सारी , सायबा अन्सारी (तृतीय पंथीय) आणि गे पार्टनर इंद्रदिप उर्फ इंदर हरिराम मेहरवाल अशी आहेत. नजमीन आणि आझाद यांचं हे बाळ आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नजमिन ही डी एन नगर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तिच्या बाळाची विक्री झाल्याची तक्रार केली. तिच्या म्हणण्यानुसार, 'शेजारीण सकिना हिने तिचा साहेब चित्रपट क्षेत्रात बाळाला काम मिळवून देईल. त्या बदल्यात दिवसाचे तुम्हाला २ ते ३ हजार रुपये मिळतील असे सांगितले. ती भेटायला गेल्यावर त्याठिकाणी साहेबाने माझ्या मुलाला घेत मला १० हजार रुपये दिले. मात्र काही दिवस होऊनही त्यांनी मुलाला परत आणले नसल्याने मी त्यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी पुन्हा काही रक्कम माझ्या हातावर ठेवत तुमचा मुलगा तुम्हाला मिळणार नाही आम्ही त्याला विकलेय असे सांगितले.' नजमीनच्या माहितीवरून, परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त राजतीलक रोशन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंदर मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देसले, सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार, उपनिरीक्षक सीमा खान, कॉन्स्टेबल स्मिता पेडणेकर, हेड कॉन्स्टेबल गोविंद पवार, कॉन्स्टेबल वारे, लाडे या पथकाने तपास सुरू केला. तपासात ते पनवेलमध्ये मेहरवालपर्यंत पोहोचले तेव्हा सत्य काही वेगळेच निघाले.
'सायबानेच आम्हाला बाळ विकले!'
मेहरवालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सायबाने त्यांना ४.६५ लाखांना बाळ विकले होते. त्यानुसार पोलिसांनी सायबा आणि अन्य आरोपीकडे चौकशी केली. तेव्हा मुलाचे आई-वडील नजमीन आणि आझाद यांनीच सायबा, राबिया व सकिना या एजंटच्या मदतीने पोटच्या पोराला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र मुलाची पुन्हा आठवण येऊ लागल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली असे तिचे म्हणणे आहे. डी एन नगर पोलिसांकडून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याच्या बदल्यात आरोपींनी घेतलेली रक्कम आझादने एका दिवसात खर्च केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार अधिक चौकशी सुरू आहे.