जळगाव : कालंका माता मंदिर परिसराला लागून असलेल्या कांचननगरात ललिता उर्फ हर्षाली भागवत साळुंखे या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. हर्षाली लहान असतानाच आई, वडीलांचे निधन झाल्याने या घटनेविषयी हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षाली हिच्या आईवडीलांचे निधन झालेले असल्याने ती भाऊ मयूर याच्यासह कांचननगरात आत्याकडेच वास्तव्याला होती. बुधवारी आत्या व भाऊ मयुर कामानिमित्ताने बाहेर गेले होते. यावेळी घरी एकट्या असलेल्या हर्षालीने ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील भांडे पडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारच्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी हर्षालीने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळाल्यावर शनीपेठ पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक यशोदा कणसे, हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुले व अयुब खान यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी हर्षालीचा भाऊ मयुर साळुंखे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.