पूजा प्रभूगावकर
पणजी: बाणास्तारी अपघातास कारणीभूत ठरलेला परेश सावर्डेकर यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने गुरुवार २४ ऑगस्ट पर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे परेश याला सध्या कोठडीत रहावे लागणार आहे.
परेश याची पत्नी मेघना सावर्डेकर हिची जबानी फोंडा न्यायदंडाधिकाऱ्यां समोर सोमवारी २१ रोजी तर व अन्य दोन जणांची जबानी बुधवार २३ रोजी नोंदवली जाणार आहे. जबानी नोंद केल्यानंतर परेशच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयात मांडली. त्यानुसार सदर सुनावणी गुरुवार पर्यंत तहकूब केली.
बाणास्तारी अपघातात हा ६ ऑगस्ट रोजी झाला होता. यात तीन जण ठार झाले होते. या अपघातास कारणीभूत ठरलेले परेश सावर्डेकर हा उच्चभ्रु कुटुंबातील असल्याने सदर प्रकरण हे हायप्रोफाईल बनले आहे. ज्यावेळी अपघात घडला, तेव्हा कार हा परेश नव्हे तर पत्नी मेघना चालवत होती, असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. फोंडा न्यायालयाने परेशचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परेश सध्या १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.