कल्याण - कल्याणरेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पे अॅण्ड पार्किगमध्ये दुचाकी पार्क करुन ठेवली असता ती गायब झाली. या प्रकरणी कल्याण रेल्वेपोलिसांनी पार्किग चालक महेश शिंदे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शार्दूल यांनी दिली आहे.
कल्याणमध्ये राहणारे अप्पू दत्ता हे मुलुंड येथे भूमीअभिलेखा कार्यालयात कामाला आहेत. ते दररोज घर ते कल्याण रेल्वे स्टेशन असा दुचाकी प्रवास करतात. त्यांची दुचाकी कल्याण स्टेशनच्या रेल्वे न्यायालयासमोरील जागेत पे अॅण्ड पार्कमध्ये पार्क करतात. मंगळवारी त्यांनी त्याची दुचाकी पार्क करुन ते कामावर गेले. ते कामावरुन परतले तेव्हा पार्किगमध्ये त्याची दुचाकी नव्हती. त्यांनी पार्किग चालक महेश शिंदे याला विचारणा केली असता त्यांनी दत्ता यांच्याकडे पावतीची मागणी केली. त्यांची पावती गहाळ झाल्याने त्यांच्याकडे पावती नव्हती. तेव्हा दत्ता यांनी पार्किकच्या नोंदणी पुस्तकात पाहा. त्यात तपशील दिसेल. तेव्हा शिंदे यांनी दत्ता यांच्या दुचाकी पार्किगसंदर्भातील खाडाखोड करीत त्यांच्या नोंदीचा कागदच फाडला. हा प्रकार पाहून दत्ता यांनी तडक रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली.
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शादरूल यांनी पार्किग चालकास अटक केली. त्यांच्या विरोधात फसवणूक करुन नोंदीचा पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. स्टेशऩ परिसरातील पे अॅण्ड पार्किग शिंदे चालवित आहे. ते रेल्वेने त्याला चालविण्यास दिले आहे की नाही. ते अधिकृत आहे की अनधिकृत याचा तपास केला जाणार आहे. याशिवाय पार्किगमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. तसेच आगीची घटना घडल्यास सुरक्षिततेची उपाययोजना नाही. पार्किगमध्ये पैसे भरून गाडी पार्क केली जात असेल ती गाडी गायब होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चालकाची आहे. मात्र त्याच चालकाने पार्किगचा पुरावाच नष्ट केला ही गंभीर बाब असल्याने या प्रकरणी अधिक तपास केला जाणार आहे. तसेच गायब झालेल्या बाईकचाही शोध घेतला जाणार आहे असे पोलिसांनी सांगितले.