मुंबई : रस्ता दाखविल्याच्या बदल्यात पार्टटाइम नोकरी देण्याचे आमिष दाखविणाराच चोर निघाल्याचा प्रकार पवईत घडला. मुलाखतीच्या नावाखाली तो पवईच्या तरुणाचा मोबाइल आणि सोनसाखळी घेऊन तो पसार झाला आहे. पवई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.पवई परिसरात राहणारा आत्माराम मूर्ती याची यात फसवणूक झाली आहे. तो मुंबई विमानतळावर काम करतो. २८ मे रोजी रात्री ८च्या सुमारास कामावरून घरी जात असताना, अनोळखी व्यक्तीने त्याला मेट्रो स्टेशनला जाण्यासाठीचा रस्ता विचारला. त्याला रस्ता दाखवून तो अंधेरी स्थानकाकडे पार्क केलेल्या दुचाकीच्या दिशेने आला. तेव्हा तो तरुणही त्याच्यामागून आला. त्याने स्टेशन दाखविल्याबाबत आभार व्यक्त केले. त्याने त्याचे नाव आकाश सांगून तो एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. मूर्तीला त्याच्या कंपनीत पार्टटाइम नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. दोन ते तीन तास कामासाठी महिन्याला पंचवीस ते तीस हजार मिळतील, असे आमिष दाखवत त्याचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर, साधारण तासाभराने त्याने मूर्ती याला फोन करून पवई साकी विहार रोड येथे मुलाखतीसाठी येण्यास सांगितले.
तो ठरल्याप्रमाणे तेथे गेला. तेथे गेल्यानंतर त्याने मुलाखतीबाबत समजावून सांगितले. मुलाखतीसाठी कंपनीचा एच.आर. व त्याची मैत्रीण येणार असल्याचे सांगितले. थोड्या वेळानंतर त्याने त्याचा मोबाइल बंद झाल्याचे सांगून मूर्तीचा मोबाईल घेतला. आकाशने त्याची गळ्यातील सोनसाखळी घरी विसरला असल्याचे सांगून, त्याची मैत्रीण त्याला रागवेल असे सांगत, मूर्ती याच्या गळ्यातील सोनसाखळी घेतली. शौचालयाला जातो, असे सांगून तो गेला तो परतलाच नाही. बराच वेळ झाला, तरी आकाश न आल्याने, त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दल विचारले, तेव्हा तो रेस्टॉरंटमधून निघून गेल्याचे समजले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.