डोंबिवली - गिफ्टच्या दुकानातून 13 लाखांच्या वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी केलेल्या तपासात दुकान चालविणा-या एक भागिदाराच चोर निघाल्याची धककादायक बाब समोर आली. याप्रकरणी आरोपी अजिंक्य राजू वनारसे (वय 21)याला अटक केली आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील दिनदयाळ रोडवर सुशांत आंग्रे आणि अजिंक्य वनारसे हे भागिदारीत रूई कलेक्शन गिफ्ट विक्रीचे दुकान चालवितात. मंगळवारी सकाळी जेव्हा हे दुकान उघडले तेव्हा दुकानातील लाखो रूपयांच्या वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास पडले. दिवाळी निमित्त हे दुकान गिफ्टने भरले होते. जवळपास 13 लाख रूपयांच्या गिफ्टच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी सुशांत यांनी विष्णुनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. दरम्यान सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश वडणे यांनी केलेल्या तपासात भागिदार असलेल्या अजिंक्यचा या गुन्हयात सहभाग असल्याचे उघड झाले. दिवा पुर्व भागात वास्तव्याला असलेल्या वनारसे याला वडणे यांच्या पथकाने डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळ रेल्वे मैदान येथून मंगळवारी रात्री अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली असून चोरलेला 13 लाख 5 हजारांचा गिफ्टचा माल आणि चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरलेला 4 लाख 50 हजाराचा टेम्पो असा एकूण 17 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.
काही दिवसांपासून अजिंक्य याचे भागिदार असलेल्या सुशांतशी पटत नव्हते. अजिंक्यने दिव्यात नवे दुकान देखील खरेदी केले होते. त्यात त्याने चोरी केलेले गिफ्ट ठेवले होते. दरम्यान भागिदारच चोर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे.