लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अलिबाग तालुक्यातील चोंढी नाका ते कार्लेखिंड निर्जन भागातील रस्त्यावर रात्रीच्या सुमारास आपण वाहनाने अथवा चालत फिरत असाल, तर सावधान! अन्यथा पडतील काठीचे किंवा चाबकाचे फटके. काही माथेफिरूंनी या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना काठीने किंवा चाबकाने फोडण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अलिबाग पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अद्याप कोणासही अटक केलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोंढी ते कार्लेखिंड या मार्गावर गेले आठवडाभर काही अनोळखी व्यक्ती आपल्या बाईकवर रात्रीच्या सुमारास फिरत आहेत. या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, चालणारे यांना बाईकवरील व्यक्ती आपल्या हातात असलेल्या काठी, चाबूक, वायरच्या मदतीने मारहाण करून भरधाव वेगाने पळून जातात. आपल्या वाहनाचा नंबर कळू नये म्हणून तो लपवला जातो. मारहाण झालेले प्रवासी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात; मात्र ते अपयशी ठरतात.
या मार्गावर स्थानिकासह पर्यटकांचीही मोठी रेलचेल असते. रात्रीच्या सुमारास हा रस्ता मोकळा असल्याने याचा फायदा घेऊन हे अनोळखी व्यक्ती मारहाण करून पळतात. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. अलिबागमध्ये असले प्रकार हे पहिल्यांदाच घडत असून, यामागे नक्की त्याचा काय हेतू आहे, हे आरोपी अटक झाल्याशिवाय समोर येणार नाही.
या घटनेबाबत अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मारहाण झालेल्या नागरिकांची भेट घेऊन माहिती घेतली आहे. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. घडणाऱ्या घटनांबाबत पोलिसांनी रात्रीची गस्त या परिसरात वाढवली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चोंढी ते कार्लेखिंडमधील निर्जन रस्त्यावर सायंकाळी ७ ते ९ या दरम्यान काही अज्ञात व्यक्ती बाईकवर येऊन प्रवासी व्यक्तींना चाबूक किंवा काठीने मारहाण करीत आहेत. याबाबत या परिसरात गस्तीपथक तयार केले आहे. अलिबाग आणि मांडवा पोलिसांचीही रात्रीची या वेळेत गस्त असून, मापगाव ग्रामसमितीमार्फतही गस्त सुरू आहे. लवकरच मारेकऱ्यांना पकडण्यात यश येईल.- शैलेश सणस, पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे