डोंबिवली: पटेरी वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याच्या कातडीच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुस जप्त केली आहेत. सिताराम रावण नेरपगार (वय ५२) रा. जळगाव आणि ब्रिजलाल साईसिंग पावरा ( २२) रा. धुळे अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
डोंबिवलीत दोघेजण पटेरी वाघ सदृश्य कातडयासह देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी माहीती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना खब-यामार्फत मिळाली. या माहीतीवरून वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडू, विनोद चन्ने तसेच वन विभागाचे वनपाल राजू शिंदे, वनरक्षक महादेव सावंत आदिंच्या पथकाने कल्याण शीळ रस्त्यावरील मानपाडा परिसरात सापळा लावला. एक कार तेथील क्लासीक हॉटेलच्या पार्किंगजवळ आली असता मिळालेल्या वर्णनावरून नेरपगार आणि पावरा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी विक्री करण्यासाठी जवळ बाळगलेले वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे सोलुन काढलेले, कडक झालेले व सुकवलेले कातडे, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला गेला. दोघे ज्या कारमधून आले ती कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.
मध्यप्रदेशमधून आणले होते कातडे
दोघा आरोपींपैकी ब्रिजलाल पावरा हा धुळयातील शिरपूर तालुक्यातील आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेलगत शिरपूर तालुका आहे. दोघा आरोपींनी पटेरी वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे कातडे मध्यप्रदेशमधून आणले होते. ते या कातडयाची विक्री ४० लाख रूपयांना करणार होते.