गुरगाव : शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा निष्काळजीपणा पेशंटच्या जिवावर बेतला आहे. डॉक्टरवर पेशंटच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. ज्या ऑर्थोपेडिक सर्जनच्या नावावर ऑपरेशन केले गेले तो डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हजरच नव्हता. तो ऑपरेशन मधेच सोडून विमानाने निघून गेला होता. यामुळे बीपी नियंत्रित न झाल्याने पेशंटचा मृत्यू झाला.
पेशंटच्या नातेवाईकांनी ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच डॉक्टरांना भेटण्यासाठी विचारले असता हॉस्पिटलने डॉक्टर नसल्याचे सांगितले. जेव्हा नातेवाईकांनी जाब विचारला तेव्हा हे प्रकरण मिटविण्याचे हॉस्पिटलमधून सांगण्यात आले.
भीम सिंह (65) हे राजस्थानमधून रिंगसला येत होते. यावेळी त्यांच्या कारचा टायर फुटला. स्टेपनी बदलून ते पुन्हा गाडीमध्ये बसणार तोच त्यांना मागून येणाऱ्या गाडीने उडविले. यामध्ये त्यांचे पाय ट्रकच्या चाकांखाली आले. यामुळे त्यांना जवळच्या कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गुरगावच्या आर्टिमिस या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
त्यांच्या नातेवाईकांना सकाळी ६ वाजता डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. यासाठी नातेवाईकांनी 3 लाख रुपये जमाही केले. मात्र, एवढी घाई दाखवूनही डॉक्टरांनी 12 वाजता ऑपरेशनला घेतले. हे ऑपरेशन दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होते. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नातेवाईकांनी ऑपरेशन करणाऱ्या ऑर्थोपेडिक सर्जनला भेटण्याची विनंती केली तेव्हा प्रशासनाने डॉक्टरला भेटू दिले नाही.
जवळपास दोन तास हुज्जत घातली गेली तरीही डॉक्टर काही भेटला नाही. या काळात अन्य नातेवाईकांनी डॉक्टरची माहिती अन्य स्टाफला विचारली. तेव्हा समजले की हा डॉक्टर गुरगावमध्ये एका खासगी क्लिनिक चालवितो. यासाठी त्याची शनिवारी दुपारी ३ वाजता विमान होते. तो रोज जाऊन येऊन करतो. यामुळे हा डॉक्टर दुपारी 2 वाजताच विमानतळाकडे निघून गेला. मग ऑपरेशन कोण करत होते, असा प्रश्न नातेवाईकांनी विचारला आहे. रविवारी सकाळी 7 वाजता पेशंटला मृत घोषित करण्यात आले होते. याबाबत पोलिसांमध्ये लिखित तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.