मुंबई - बाँम्बे रुग्णालयात एका रुग्णाला केअर टेकरची मदत घेणे भलतेच महागात पडले आहे. औषधोपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने रुग्णाने केअर टेकरजवळ त्याचे एटीएम दिले होते. पैसे काढून केअर टेकरने पळ काढला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी केअर टेकरला अटक केली आहे.
बोरिवली परिसरात राहणारे नील दांडेकर यांना मागील काही दिवसांपासून यकृताचा त्रास होत होता. त्यासाठी ते १८ एप्रिलपासून बाँम्बे रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान नीलला त्याच्या देखभालीसाठी एका केअर टेकरची गरज होती. त्यानुसार त्याच्या मित्राने त्याला प्रशांत काथे याचा नंबर दिला होता. त्यानुसार आरोपी प्रशांत काथे (३५) हा नीलच्या मदतीसाठी रुग्णालयात थांबायचा. काही दिवसांपूर्वी नीलवर उपचार सुरू होते. त्यावेळी डाँक्टरांनी त्याला काही औषधे आणण्यास सांगितली. मात्र औषधांची किंमत पाहता. तितके पैसे नीलकडे नव्हते. त्यामुळे नीलने प्रशांतजवळ त्याचे एटीएम कार्ड आणि पासवर्ड देत पैसे काढून आणण्यास सांगितले.
नीलने सांगितल्यानुसार प्रशांतने पहिल्यांदा एक हजार काढले. त्यानंतर नीलने पून्हा त्याला दीड हजार रुपये काढण्यास सांगितले. त्यानुसार प्रशांतने पुन्हा दीड हजार असे एकून अडिच हजार काढले. प्रशांतला जाऊन खूप वेळ झाला होता. मात्र तो परत आला नसल्यामुळे नील त्याला फोन लावत होता. सुरूवातीला जवळील एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे तो लांब पैसे काढण्यासाठी आला असल्याचे त्याने सांगितले. मात्र कालांतराने त्याचा फोन बंद येत होता.
त्यावेळी नीलने त्याचे बँकेत फोनकरून कार्ड ब्लाँक केले. मात्र कित्येक तास उलटले तरी प्रशांत न आल्यामुळे तो कार्ड आणि पैसे घेऊन पळून गेल्याची नीलला खात्री पटली. त्यानुसार त्याने आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. नीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रशांतचा माघ काढण्यास सुरूवात केली. प्रशांत हा कल्याणच्या विठ्ठलवाडी परिसरात रहात असून त्याचे मोबाइल लोकेशन ही त्याच परिसरात दाखवत असल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत वाखारे यांनी दिली.