उत्तरप्रदेशच्या शाहजहापूर जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाने बेडवरून झालेल्या वादातून दुसऱ्या रुग्णाची हत्या केल्याची घटना घडली आहे. मयत व्यक्तीचं नाव हंसराज असल्याचं सांगितलं जात आहे. हंसराज पोटात दुखत असल्याने रुग्णालयात भरती होता. तर आरोपीचं नाव अब्दुल रहमान आहे. त्याला मानसिक आजार आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्याने हंसराज शनिवारी रात्री रुग्णालयाच्या बेड नंबर २१ वर उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्याच शेजारी बेड नंबर २७ वर मानसिक आजाराने ग्रस्त असलेला अब्दुल रहमानवर उपचार सुरू होते. रहमान रविवारी सकाळी वॉशरूमला गेला होता. जेव्हा तो वॉशरूमवरून परत आला तेव्हा त्याचा बेड नंबर तो विसरला आणि हंसराज याच्या बेडजवळ येऊन वाद घालू लागला. हंसराजने जबरदस्ती माझ्या बेडवर कब्जा केल्याचा दावा अब्दुल रहमानने केला.
हंसराजने याचा विरोध केल्यानंतर अब्दुल रहमानचा राग अगावर झाला. संतापलेल्या अब्दुल रहमानने हंसराजला बेडवरून उचलून खाली जमिनीवर आपटले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हंसराजच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर बेजबाबदारपणा केल्याचा आरोप केला आहे. हंसराजच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी अब्दुल रहमान आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. त्याचसोबत पोलिसांनी हंसराजचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस अधिकारी प्रविण कुमार यांनी सांगितले की, हत्या केलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.