पाटणा : पाटण्यात नोकरी देण्याच्या नावाखाली 300 हून अधिक तरुणांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 300 तरुणांची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना बिहारची राजधानी पाटणामध्ये समोर आली आहे. बिहारसह अनेक राज्यांतील फसवणुकीतील पीडितांनी एकत्रितपणे कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पासपोर्ट आणि इतर बाबींवर होणाऱ्या खर्चाचा दाखला देत प्रति युवक 20 ते 50 हजार रुपये वसूल केल्याचे सांगण्यात आले.
फसवणूक झालेले तरुण बिहार व्यतिरिक्त झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील आहेत. छापरा येथील रहिवासी मो. सलीम खान याने सांगितले की, कंपनीचे कार्यालय फ्रेझर रोड येथे आहे. इराकमध्ये ड्रायव्हरची नोकरी मिळवण्याच्या इच्छेने तो याठिकाणी आला होता. तसेच, कंपनीचे अधिकारी अनेक देशांच्या बांधकाम कंपन्यांमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त प्लंबर, सुतार, मेकॅनिक इत्यादी पदांवर नोकरी मिळवण्याचा दावा करत होते. पत्रकात जाहिरात पाहून त्याने कंपनीच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला होता.
याचबरोबर, फसवणूक झालेल्यांनी सांगितले की, राकेश चौहान नावाच्या व्यक्तीने त्यांना अमेरिकन डॉलरमध्ये 80 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार देण्याचे म्हटले होते. यामुळे तो जाळ्यात अडकला. व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडून 50 हजार रुपये उकळले. फसवणूक करणाऱ्यांनी त्याचा पासपोर्टही आपल्याकडेच ठेवला होता. शुक्रवारी तो येथे आले असता त्यांना कंपनीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे समजले.
दुसरीकडे, सिवान येथील मकसूद अली याने सांगितले की, रक्कम वसूल केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बनावट मुलाखतही घेतली होती. काही दिवसांपूर्वी शेकडो तरुणांनी परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी एसके पुरी पोलिस ठाण्यात एकत्रित अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.