बिहारमध्ये वाळूमधून मोठी कमाई करण्यासाठी राज्यातील वाळू माफिया काहीही करायला तयार आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पटना जिल्ह्यातील बिहटा पोलीस स्टेशन हद्दीतील परेव गावातील आहे, जिथे वाळू ओव्हरलोडिंग चेकिंग करत असताना, ट्रक चालक आणि वाळू माफिया रस्त्यावर धावत आले आणि त्यांनी जिल्हा खाण इन्स्पेक्टर महिलेसह इतर कर्मचार्यांना विटा आणि दगडांनी मारहाण केली.
मारहाणीच्या भीतीने महिला इन्स्पेक्टर जीव वाचवण्यासाठी धावतच राहिल्या, मात्र त्यांना मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोमवारी गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा खाण विभागाच्या महिला इन्स्पेक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी बिहटा येथील परेव गावाजवळ वाळू ओव्हरलोडिंग विरोधात तपासणी मोहीम सुरू केली होती. याच दरम्यान, ट्रकचालकांशी बाचाबाची झाली, त्यानंतर ट्रकचालकांनी माहिला इन्स्पेक्टरसह इतर कर्मचाऱ्यांवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यास सुरुवात केली.
जिल्हा खाण पथक जीव वाचवण्यासाठी धावत राहिले, त्यानंतरही त्यांना या लोकांनी मारहाण केली. अवैधरित्या भरलेले सुमारे दीडशे वाळूचे ट्रक पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्यांची सुटका करण्यासाठी वाळू माफिया व त्यांच्या साथीदारांनी हल्ला करण्यास सुरुवात केली व महिला इन्स्पेक्टर व त्यांच्या पथकाचा पाठलाग करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाण अधिकारी आणि इन्स्पेक्टर यांच्या पथकाला काही लोकांनी अडथळा आणला आहे, ही बाब गांभीर्याने घेत आमचे डीटीओ आणि एसडीएम दानापूर यांच्या नेतृत्वाखाली रिफोर्समेंट पथक गेले आणि 50 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"