रेणापूर (जि. लातूर) : किरकाेळ वादातून मुलानेच पित्याचा डाेक्यात लाेखंडी राॅड घालून खून केल्याची खळबळजनक घटना रेणापूर तालुक्यातील आरजखेडा शिवारात घडली. याबाबत आईच्या तक्रारीवरून रेणापूर ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा मुलाविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी त्याला अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, मयत रामराव ग्यानबा बोडके (वय ५२) यांना सात एकर शेती असून, त्यांना पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार आहे. मोठा मुलगा बाळासाहेब रामराव बोडके (२६) याने दोन महिन्यांपासून जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान, या व्यवसायात सतत नुकसान हाेत हाेते. त्यात त्याने आपल्या घरच्या बैलाचीही विक्री केली होती. यामुळे गत दोन महिन्यांपासून मुलगा आणि पित्यामध्ये सतत कुरबुर सुरू हाेती. गुरुवार, २८ सप्टेंबरला नेहमी प्रमाणे रामराव बोडके हे शेतात गेले हाेते. दुपारी शेतातील पत्र्यांच्या शेडमध्ये बसले असता, त्यांचा मुलगा बाळासाहेब बोडके हा तेथे आला. पित्यासमोरच शेडमध्ये ताे दारू पीत होता. यावेळी पित्याने रागावल्याने मुलगा-पित्यामध्ये किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात मुलाने शेडमध्ये त्यांच्या डाेक्यात लोखंडी रॉडने एकामागून एक वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या रामराव बाेडके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मुलानेच साडेसात-आठच्या सुमारास घरच्यांना, गावातील लोकांना वडिलांना कुणीतरी मारले आहे, असे सांगत कांगावा केला. घटनास्थळी नातेवाईक, गावातील लोकांनी धाव घेतली. रेणापूर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.
मयत रामराव बोडके यांच्यावर पार्थिवावर शुक्रवारी दुपारी आरजखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मुलानेच आईला सांगितले, पित्याचा खून मीच केला आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात मयताची पत्नी जागृती रामराव बोडके (४७) यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशिरा मुलगा बाळासाहेब बोडके याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.