मुंबई :
दोन शहरांदरम्यान सामानाची ने-आण करणाऱ्या एका व्यापाऱ्याचा ट्रक जप्त करून तो सोडविण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आणि त्या ट्रकची वाहतूक नियमितपणे व्हावी, याकरिता महिन्याला दीड लाख रुपयांचा हप्ता मागणाऱ्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या (जीएसटी) अधीक्षकाला सीबीआयने अटक केली आहे.
गुजरातमधील मोदासा ते वापी या दोन शहरांदरम्यान मुस्तफाभाई इब्राहिमभाई या व्यापाऱ्याचा ट्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी अडवला. झडतीदरम्यान उपस्थित असलेला जीएसटी विभागाचा अधिक्षक दिनेश याने ट्रक आणि त्यातील सामान सोडण्यासाठी मुस्तफाकडे १२ लाख रुपयांची मागणी केली तसेच, या मार्गावरून त्याची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी दरमहा दीड लाख रुपये देण्याचीही मागणी करताच व्यापाऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयने कारवाई केली.
व्यापाऱ्याकडे अशी मागितली लाच- २ नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे मुस्तफाभाईने १२ लाख रुपये दिनेश या अधिकाऱ्याला दिले तसेच दर महिन्याला दीड लाख रुपये देणे शक्य नसून ७५ हजार रुपये देऊ शकतो, असे सांगितले. - मात्र, या तूर्तास ७५ हजार रुपये दे आणि डिसेंबरपासून महिन्याला दीड लाख रुपये दे, असे दिनेशने मुस्तफाभाईला सांगितले. - त्यानंतर मुस्तफाभाईने सीबीआयकडे लेखी तक्रार केली तसेच या तक्रारीसोबत दोघांमध्ये झालेले मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंगदेखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांना त्याने दिले. - सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या संभाषणाची शहानिशा केल्यानंतर दिनेशला अटक केली आहे.