मनोज गडनीसमुंबई : ठाणे, बेलापूर, पनवेल औद्योगिक पट्ट्यांतील एका उद्योगाला १७ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या स्टेट बँकेच्या माजी मुख्य महाव्यवस्थापकासह अन्य तिघांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एम.पी.नागर असे या महाव्यवस्थापकाचे नाव असून त्याला २०२१ मध्ये बँकेने सेवेतून बडतर्फ केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यात कार्यरत असलेल्या एका कंपनीने स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (तत्कालीन) कर्ज मागितले होते. त्यावेळी नागर बँकेत मध्यम उद्योगांना कर्ज वितरण करणाऱ्या विभागात कार्यरत होता. कंपनीने या कर्जासाठी जी कागदपत्रे सादर केली होती त्यात कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची बनावट माहिती दिली होती. नागरला याची कल्पना असूनही त्याने कंपनीला १७ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून दिले. यासाठी संबंधित कंपनीकडून ५ लाख रुपयांची मागणी केली. कंपनीनेही नागरला पैसे देण्यास होकार दिला. मात्र या प्रकरणी लाचखोरी झाल्याची माहिती सीबीआयला मिळाल्यानंतर नागर याच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.
ज्या दिवशी कंपनीला कर्ज मंजूर झाले आणि त्याची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये जमा झाली त्याच दिवशी संबंधित कंपनीने लाचेपोटी ठरलेली पाच लाख रुपयांची रक्कम या प्रकरणात आरोपी असलेला एसबीबी कंपनीचा प्रोप्रायटर अश्विनी अगरवाल याच्या बँक खात्यात जमा केली. अगरवालने त्यापैकी प्रत्येकी अडीच लाख रुपये या प्रकरणातील अन्य दोन आरोपी मनोज कुमार व मीना बहेती यांच्या खात्यावर जमा केले. बहेतीच्या खात्यावर जमा झालेले अडीच लाख त्याने नागरच्या खात्यावर जमा केले. तर, मनोज कुमार याच्या खात्यावर जमा झालेल्या अडीच लाख रुपयांपैकी ९० हजार रुपये त्याने काढले व उर्वरित दीड लाख रुपये नागरच्या खात्यावर जमा केले.