लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वैद्यकीय मदतीसाठी पैशाची मागणी करुन आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. इतर ३ महिला आमदारांकडूनही पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांची कन्या पूजा (रा. कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी मुकेश राठोड व गुगल पे फोन धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांना एक गुगल-पेचा नंबर देऊन त्यावर ३,४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही अशा प्रकारे पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या महिला आमदारांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा फोन नंबर मागून त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्याला नेमके आजाराविषयी सांगता आले नाही. त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पैसे पाठविले नाही. त्यानंतर मिसाळ यांनी आपल्या कन्येला तक्रार देण्यास सांगितले. राठोड हा बुलढाणा येथील असल्याचे समजले असून पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे.