पायल घोषने मागितली रिचा चढ्ढाची माफी; न्यायालयाकडून मानहानीचा दावा निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 03:12 AM2020-10-15T03:12:17+5:302020-10-15T06:45:22+5:30
रियाने पायलबरोबरच कमाल खान आणि एका वृत्तवाहिनीविरोधातही मानहानीचा दावा दाखल केला होता.
मुंबई : अभिनेत्री रिचा चढ्ढाबाबत केलेले बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान आपण मागे घेत असून तिची माफी मागत असल्याचे अभिनेत्री पायल घोषने सांगितल्यावर उच्च न्यायालयाने रिचाने पायलविरोधात केलेला मानहानीचा दावा निकाली काढला.
रियाने पायलबरोबरच कमाल खान आणि एका वृत्तवाहिनीविरोधातही मानहानीचा दावा दाखल केला होता. पायलने माफी मागितली असली तरी आपण हा दावा लढणार, असे कमाल खानच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्या. ए. के. मेनन यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने कमाल खान याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत दाव्यावरील सुनावणी सहा आठवड्यांनी ठेवली.
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर पायल घोषने लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि त्यात रिचावरही आरोप केले. एका वृत्तवाहिनीने व कमाल खानने पायलचे ट्विट शेअर केल्याबद्दल रिचाने पायल, कमाल खान व वृत्तवाहिनीविरोधात मानहानीचा दावा करीत १.१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, पायल व रिचाने आपापसांत हे प्रकरण मिटविण्यासाठी न्यायालयापुढे सहमती दर्शविली.