डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या दोन डॉक्टरांच्या जामीन अटींमध्ये उच्च न्यायालयाने अंशत: सुधारणा करत दोन्ही डॉक्टरांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी दिली. मात्र, तेथे जाण्यापूर्वी त्यांना त्यांच्या प्रस्तावित राहत्या घराचा पत्ता, मोबाइल नंबर देण्याचे निर्देशही आरोपींना दिले.आरोपी डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी जामीन अटींमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठापुढे होती. नायर रुग्णालयात घेत असलेले पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची मुदत १० डिसेंबर रोजी संपत असल्याने या दोन्ही आरोपी रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहू शकत नाहीत. तसेच त्यांना मुंबईत अन्य ठिकाणी राहणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने तिन्ही आरोपींची सशर्त जामिनावर सुटका केली. त्यात त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून न जाण्याचीही अट घालण्यात आली होती. या अटीत सुधारणा करावी, यासाठी भक्ती व अंकिता यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे त्यांनी अर्जात म्हटले आहे.मात्र, सरकारी वकिलांनी या अर्जावर आक्षेप घेतला. या दोघी मूळगावी परतल्या तर खटल्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे खटल्यास विलंब होईल व तोपर्यंत अन्य साक्षीदार कॉलेज सोडून जाऊ शकतात, असे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने त्या दोघींना खटल्यास उपस्थित राहण्यासंदर्भात हमी देण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांच्या प्रस्तावित राहत्या ठिकाणचा पत्ता व मोबाइल नंबरही देण्याचे निर्देश दिले.काय आहे प्रकरण ?पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भक्ती, अंकिता व आणखी एका डॉक्टरला मुंबई पोलिसांनी २०१९ मध्ये अटक केली. तसेच रॅगिंग ॲक्टअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. त्याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविला.
पायल तडवी आत्महत्या : ‘त्या’ डॉक्टरांना मूळ गावी जाण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 1:24 PM