मंगेश कराळे
नालासोपारा - दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या राजस्थान राज्यातील सराईत दुकलीला पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना पकडण्यात यश मिळाले आहे. या दोन्ही आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल करत तीन दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी बलराम पालकर यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वाकणपाडा येथे राहणारे संतोषकुमार केशरवाणी (४३) यांची दुचाकी सिताराम अपार्टमेंट येथील मोकळया जागेत पार्किंग केली होती. ३ जानेवारीला चोरट्याने दुचाकी चोरी केल्या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचे अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांचे मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थान राज्यातील सराईत आरोपीत अनिलकुमार बिष्णोई (२३) आणि रामाराम सुतार (२४) या दोघांना कामण येथून ५ जानेवारीला ताब्यात घेतले. आरोपींकडे विचारपूस व तपासा दरम्यान त्यांनी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आली. अधिक चौकशी केली असता आरोपींनी ३ गुन्हयातील ३ दुचाकी चोरी केल्याचे सांगितल्याने गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला. अनिलकुमार याच्यावर राजस्थान येथील पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली ४ गुन्हे आणि रामाराम याच्यावर ७ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपीकडून पोलिसांनी पेल्हार येथील ३ व शांतीनगर येथील १ असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर यांनी पार पाडली आहे.