पिंपरी : अंमली विरोधी पथकाने सापळा रचून मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ विक्रीस आलेल्या आरोपीला अत्यंत शिताफीने फुगेवाडी येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला. कौशिक बाबू वेगडा (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. मीरा भाईंदर येथून शहरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आरोपी आला होता. रविवारी त्यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेफेड्रोन अंमली पदार्थ विक्रीसाठी आला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलीस कॉन्स्टेबल शैलेश मगर यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सापळा रचून आरोपीला फुगेवाडी येथे त्यास पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मॅफेड्रिन (एमडी) या अंमली पदार्थाचा साठा आढळुन आला. पोलीस पथकाने हा माल हस्तगत केला. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात वसंत मुळे, प्रदीप शेलार, राजन महाडिक, संतोष भालेराव, प्रसाद मांगीलवाड, , दिनकर भुजबळ, संतोष भालेराव, शैलेश मगर, दिनकर भुजबळ, दादा धस, प्रदीप गुट्टे यांचा समावेश होता. शहरात ऑगस्टमध्ये नव्याने पोलीस आयुक्तालय सुरू झाले. त्यानंतर काही दिवसांनी अमली पदार्थविरोधी पथक हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने तीन महिन्यांत विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे १ कोटी १३ लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याचा साठा, विक्री व वाहतूक करणाºया १६ जणांवर कारवाई केली. गुटख्याची वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. ४० लाखांचा गुटखा पकडण्याची सर्वांत मोठी कारवाई चिंचवडमध्ये झाली आहे. अमली पदार्थविरोधी पथक, तसेच अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलीस यांच्या वतीने काही दिवसांपुर्वीच बेकायदा गुटखा विक्री करणाºयांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. पिंपरी, हिंजवडी, चिखली, वाकड, पिंपळे सौदागर, वाकड, चिंचवड, चिखली आदी भागांत संयुक्त कारवाई करून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर पिंपरीतून सुमारे २७ किलो गांजा या पथकाने आरोपींकडून जप्त केला आहे. मेफेड्रोन (एमडी) यासारख्या अंमली पदार्थांची शहरात विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने अंमली पदार्थ विरोधी पथक आणखी सजग झाले आहे.
पिंपरीत मेफेड्रोन विक्रीस आलेल्या एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 2:08 PM