पुणे : ज्या लोकांना वाहनकर्जाची गरज आहे. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत. त्यांना आपल्या जाळयात ओढून त्यांची लाखो रुपयांची वाहनकर्जे मंजुर करणाऱ्या तीन ठकसेनांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील सरकारी व खासगी बँकांच्या विविध शाखांमधून तब्बल ५९.५ लाखांची कर्जेप्रकरणे मंजुर केली असून त्यांच्याकडून ४० लाख रुपयांच्या ४ गाड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणात एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे. धनंजय बाळासो जाधव (वय ४८, रा. ॠषीकेश को ऑप हौसिंग सोसायटी, माळवाडी रस्ता), आनंद प्रेमसिंग कुमार उर्फ राकेश परमार (वय ४१, वराही अपार्टमेंट, कात्रज कोंढवा रस्ता), अभिजित रमेश सोनवणे (वय ३०, कोंढवे धावडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी विमाननगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापक श्रृती जैन यांनी त्यांच्या बँकेतून जाधव याने वाहनकर्ज प्रकरण करुन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. अर्जाची चौकशी करताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस हवालदार अजय खराडे यांना या गुन्ह्याचे स्वरुप मोठे असून त्यात आणखी काही व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी तांत्रिक माहितीव्दारे तपास सुरु केला. अटक आरोपीपैकी आनंद प्रेमसिंग कुमार उर्फ राकेश परमार हा गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आहे. तो ज्या लोकांना वाहन कजार्ची गरज आहे. मात्र त्याकरिता त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत त्यांना हेरुन आपल्या जाळयात ओढायचा. तसेच दुसरा आरोपी अभिजित रमेश सोनवणे याच्याकरवी बनावट आयटी रिटर्न्स, बदल केलेले शॉप अँक्ट लायसन्स तयार करण्याचे काम करत असे. सुरुवातीला एखाद्या सहकारी बँकेत चालु (करंट) खाते काढून ज्या बँकेतून कर्ज प्रकरण केले आहे. त्या बँकांना बँक ऑफ महाराष्ट्रचे अकाऊंट देऊन त्यात पैसे ट्रान्सफर केले जायचे. परमार याने एकूण ९ सरकारी व खासगी बँकांच्या पुण्यातील विविध शाखांमधून एकूण ५९.५ लाखांची कर्ज प्रकरणे केली. आरोपीकडून ४० लाखांच्या चार गाड्या जप्त केल्या आहेत. परमार याच्यावर आणखी पाच गुन्हे दाखल असून त्याबाबत तपास सुरु आहे.
पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडळ चारचे पोलीस उपआयुक्त प्रसाद अक्कानवरु, येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, बलवंत मांडगे, पोलीस हवालदार अविनाश शेवाळे, मोहन काळे, अजय खराडे, संजय आढारी यांनी ही कामगिरी पार पाडली.