पुणे : भारत-न्यूझीलंड दरम्यान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या मुंबईतील एकाला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पकडले. या कारवाईत मोबाइल संच, सट्टा घेण्यासाठी वही असा माल जप्त करण्यात आला. भाविन सामजी आनम (वय ३८, रा़ मुलुंड, मुंबई) असे त्याचे नाव आहे़ त्याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत मुंबईतील आणखी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे़ भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी तातडीने कारवाई करण्याची सूचना केली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक लोणावळ्यात रवाना झाले. पोलिसांनी हॉटेलमधील खोलीत छापा टाकला. तेव्हा भाविन सामजी आनम (वय ३८,रा. मुळेबाई चाळ, मुलुंड, मुंबई) एक दिवसीय क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत होता. त्याच्याकडून मोबाइल संच आणि वही जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने सट्टा खेळणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांकडून दया भानूशाली, चेतन झाला (वय ४६,रा. खारघर, नवी मुंबई), नीरव रमानी , माँटू जैन, शशी आजवानी (तिघे रा. मुलुंड, मुंबई), सुनिल जैस्वाल (रा. मिरा रोड, ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक जीवन राजगुरु, महेश मुंडे, विजय पाटील, सुनिल बांदल, दिलीप जाधवर आदींनी ही कारवाई केली.
भारत- न्यूझीलंड क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टा घेणाऱ्या एकाला लोणावळ्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 4:15 PM