लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खून करण्याच्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत असलेल्या युवकाला वाहतूक पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मो. इमरान मो. असरार (१९) रा. अन्सारनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. लकडगंज वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे, सहायक उपनिरीक्षक अशोक चरडे, रमेश चकोले, पंकज नागोसे आणि चंद्रकांत कटरे यांना मंगळवारी दुपारी चालानच्या कारवाईसाठी पाचपावलीत तैनात करण्यात आले होते. त्यांना आरोपी बाईकवर संशयास्पद स्थितीत जाताना दिसला. त्यांनी आरोपीस थांबवून कागदपत्र दाखविण्यास सांगितले. त्याने कागदपत्र न दाखविल्यामळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ चाकू आढळला. चाकू आढळल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. इमरानचा एका युवकासोबत वाद सुरु आहे. त्याचा खून करण्याचा इमरानचा विचार होता. त्यामुळे तो दोन साथीदारांसोबत युवकावर हल्ला करण्यासाठी सिंधू कॉलेजजवळ गेला होता. युवक न भेटल्यामुळे तो घरी परत जात होता. दरम्यान पोलिसांनी त्यास पकडले. इमरान आणि त्याच्या साथीदारांना पाचपावली पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे. या कारवाईमुळे वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
नागपुरात खून करण्याच्या हेतूने फिरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:23 PM
खून करण्याच्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत असलेल्या युवकाला वाहतूक पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची सतर्कता