पौड : मुळशी खुर्द (ता.मुळशी) धरणाच्या बॅक वॉटर मध्ये (दि .२० ) होळीच्या दिवशी आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत पोहायला गेलेला असताना अजय घोडगे (वय २२, रा.पाषाण) हा तरुण मुळशी धरणात पोहताना बुडाला. सदर घटनेची प्रत्यक्षदर्शी पंकज मोरे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सुचनेनुसार पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली.परंतु उशीर झाल्याने व अंधार पडल्याने २० मार्च रोजी त्याचा शोध घेता आला नव्हता. ता.२१ रोजी सकाळी लवकरच पौडचे पोलीस, एनडीआरएफचे जवान व मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीम यांचे शोधपथक अजयचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते.पाषाण येथील रहिवासी असलेला अजय हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. होळीची सुट्टी असल्याने तो सकाळीच मित्रांसमवेत मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता.दुपारी २ ते ३ च्या सुमारास तो मित्रांसोबत मुळशी खुर्द गावाच्या हद्दीत धरणात पोहण्यासाठी उतरला. पाण्यात बराच आत गेल्याने पोहताना त्याला दम लागल्याने बुडाला. या भागात धरणात अंतर्गत प्रवाह व पाण्याची खोली अधिक असल्याने यापूवीर्ही अशा बुडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच टाटा कम्पनी कडून या परिसरात पोहण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही अजयच्या अति धाडसामुळे त्याला प्राण गमवावे लागले. मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते व एनडीआरएफच्या शोध पथकाने २१ मार्च रोजी दिवसभर शोध घेतल्यानंतर संध्याकाळी ५ च्या सुमारास अजयचा मृतदेह सापडला. यावेळी पौडचे पोलीस उपनिरीक्षक लवटे, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास पौडचे पोलीस स्टेशनचे बिटअंमलदार मुजावर हे करत आहेत.
मुळशी धरणात पोहण्यासाठी गेलेला एकजण बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 7:45 PM