एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला आणि अनेक वर्षांनी त्याबाबत जाऊन पोलिसांना सांगितलं असं तर फार क्वचित बघायला मिळतं. त्यातल्या त्यात जर एखाद्याने गुन्हा १७ वर्षाआधी केला असेल आणि त्याबाबत आत्ता पोलिसांना सांगितलं असं तर बघायलाही मिळत नाही. अशीच एक घटना छत्तीसगढच्या करकाभाठ गावातील आहे. इथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की, त्याने २००३ साली म्हणजे १७ वर्षाआधीच एका व्यक्ती छबेश्वल गोयलची हत्या करून त्याला खड्ड्यात दफन केलं होतं.
आजतकने दिलेल्या रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तीची त्याने १७ वर्षाआधी हत्या करून दफन केलं होतं. आता त्या व्यक्तीचं भूत स्वप्नात येऊन त्याला त्रास देत आहे. या भीतीमुळेच त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गुपित पोलिसांसमोर उघड केलं.याप्रकरणी पोलिसांनी आता त्या व्यक्तीकडून सांगण्यात आलेल्या ठिकाणावर खोदकाम सुरू केलं आहे. मात्र अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. त्यामुळे या प्रकरणाचं सत्य पूर्णपण समोर आलेलं नाही.
खोदकामानंतर जर मृतदेहाचा अंश सापडला तरच काही सांगितलं जाऊ शकतं. पण ही व्यक्ती ज्या व्यक्तीच्या हत्येबाबत बोलत आहे ती व्यक्ती २००३ पासून आपल्या गावातून गायब आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी खोदकाम करत आहे.
स्वत:ला आरोपी सांगत असलेल्या करकाभाठ गावातील रहिवाशी टीकम कोलियाराचं वय ४० वर्षे आहे आणि त्याने त्याच्याच गावातील छबेश्वल गोयलची २००३ मध्ये रॉडने मारून हत्या केल्याचं सांगितलं. हत्येनंतर कोसमी गावात एका ठिकाणी खड्डा करून त्याने त्याला गाडल्याचंही तो म्हणाला.