पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी याप्रकरणी आता मोठा खुलासा केला असून महेश पांडेय नावाच्या व्यक्तीला दिल्लीतून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने वापरलेला मोबाईल आणि सिमही जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पांडेय याचा कोणत्याही गँगशी काही संबंध नाही, त्याने याआधीही मोठ्या लोकांसोबत काम केलं आहे. जेव्हा महेशला पप्पू यादव यांच्याबाबतची माहिती मीडियाच्या माध्यमातून मिळाली, तेव्हा त्याने युएईमध्ये राहणाऱ्या आपल्या मेव्हणीचं सिम कार्ड वापरून हा सर्व कट रचला. लवकरच या प्रकरणात आणखी खुलासे होतील.
काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी अभिनेता सलमान खानला लॉरेन्स गँगकडून मिळालेल्या धमकी संदर्भात पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लॉरेन्स गँगला आव्हान देत २४ तासांत त्याचं नेटवर्क उद्ध्वस्त केलं जाईल, असं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनंतर पप्पू यादव यांना एक कॉल आला जो महेशने स्वतः केला होता. यामध्ये पप्पू यादव यांना धमकी दिली. या धमकीनंतर त्यांनी केंद्राकडे आपली सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.
पप्पू यादव यांनी १३ ऑक्टोबरला ट्विट केलं होतं. एक गुन्हेगार सर्वांना धमकावत आहे. कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचा प्रमुख, आता उद्योगपती राजकारणी मारले गेले. कायद्याने परवानगी दिली तर लॉरेन्स बिश्नोईसारख्या या गुन्हेगाराचं संपूर्ण नेटवर्क २४ तासांत उद्ध्वस्त करेन असं म्हटलं होतं.