मुंबई - राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या सेवा मुदतवाढीला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ही मुदतवाढ भेदभाव आणि सेवाविषयक नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा करत वकील आर. आर. त्रिपाठी यांनी रिट याचिका केली असून त्यावर येत्या सोमवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.
३१ ऑगस्टला निवृत्त होत असताना सरकारने पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ती मुदत ३० नोव्हेंबरला संपत असताना पुन्हा तीन महिन्यांचा मुदतवाढीचा आदेश काढून सरकारने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ती रद्द करण्यात यावी याकरिता विनंती याचिकाकर्त्याने या याचिकेत केली आहे. तसेच मुदतवाढीचा निर्णय घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप करत त्याची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशीचे आदेश द्यावे अशी विनंतीही याचिकमार्फत करण्यात आली आहे.