टिकटॉक अॅपविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:46 PM2019-11-18T15:46:43+5:302019-11-18T15:47:37+5:30
या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबई - अनेकांना वेड लावणारं टिकटॉक अॅपविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दाखल करणारी महिला मुंबईतील असून तिचे नाव हिना दरवेश असं आहे. याचिका दाखल करताना हिना या गृहिणीने टिकटॉकचा वापर केल्याने मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा करत टिकटॉक अॅपवर बंदी आणण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या अॅपमध्ये अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो. हिना दरवेश यांनी वकील अली काशिफ खान यांच्यामार्फत ही याचिकेवर हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
या अॅपच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन होण्यास हे अॅप कारणीभूत ठरत आहे. तसेच, व्यंगात्मक व्हिडिओमुळे तरूणाईंमध्ये आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे दिसत आहे, असे या याचिका दाखल करणाऱ्या महिलेने याचिकेत नमूद केले आहे. तसेच जातीयवाद निर्माण होणारे व्हिडीओ प्रसारित केले जातात. त्यामुळे जातीयवाद फोफावू शकतो. यामुळे याचा परिणाम देशाचा विकासावर देखील होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्ट या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून हायकोर्ट कोणता निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.