नाशिक : प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ११) दुपारी लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी युवतीसह कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे. प्रेमप्रकरणातूनच ही घटना घडल्याची प्रथमदर्शनी समोर येत असून मुलगा आणि मुलगी दूरचे नातेवाईक असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्लम्बिंग व्यवसाय करणारा युवक गोरख काशीनाथ बच्छाव याची तीन वर्षांपासून रावळगाव येथील एका युवतीशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने गोरखकडून लग्नाची मागणी होऊ लागली. मात्र युवतीच्या कुटुंबीयांकडून त्यास विरोध होता. यातून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली. वाद मिटावेत म्हणून समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास युवतीचे कुटुंबीय लोहोणेर येथे दाखल झाले. मात्र बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढत गेला. यावेळी युवतीच्या कुटुंबीयांकडून गोरख यास मारहाण करण्यात आली. यावेळी गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आल्याने गोरख हा स्वतःच्या बचावासाठी येथील ओमसाई मोबाइल शॉपी या दुकानात घुसला. यावेळी युवतीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून माचीसची काडी फेकल्याने गोरख बच्छाव हा सुमारे ३५ टक्के भाजला असून, त्यास तातडीने पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. बघ्यांनी मात्र घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी संशयिताना घेतले ताब्यात
याबाबत पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे (२३), गोकुळ तोंगल सोनवणे (५७), निर्मला गोकुळ सोनवणे (५२), हेमंत गोकुळ सोनवणे (३०), प्रसाद गोकुळ सोनवणे सर्व रा. बी.सेक्शन, रावळगाव यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
जखमी युवकाला रॉडने मारुन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवती आणि तिच्या भावांकडे पोलीस चौकशी सुरू आहे. याप्रकरणी मुलीचे आई-वडिल आणि तिचे 2 भाऊ होते. प्रथमदर्शनी हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाल्याचे निष्पन्न होत आहे. युवक आणि युवती हे दूरचे नातेवाईक आहेत. त्यातच, मुलीच्या कुटुंबीयांचा लग्नासाठी विरोध होता. सदर व्यक्तीस नाशिक शहरात शिफ्ट करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार युवकाची प्रकृती स्थिर आहे.
सचिन पाटील, पोलीस अधिक्षक