नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अटक केली. कोर्टाकडून ईडीला चार दिवसांची कोठडीही देण्यात आली आहे. यापूर्वी, ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता.ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि संजय पांडे यांच्यावर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने गुन्हा दाखल केल्यानंतर एका आठवड्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.एफआयआरमध्ये काय आरोप आहेत?लाइव्ह मिंटमधील वृत्तानुसार, नुकत्याच नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांना मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या iSEC या कंपनीचा शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे इंटरसेप्ट करण्यासाठी समावेश करण्यात आला होता. एफआयआरमध्ये असेही आरोप करण्यात आले होते की, संजय पांडे यांच्या कंपनीला स्टॉक एक्स्चेंज कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याबद्दल 4.45 कोटी रुपये देण्यात आले होते.