इंदूर – मध्य प्रदेशातील इंदूर येथे ११ वीत शिकणाऱ्या एका मुलीला सिगरेट पित असल्याने जीव गमावावा लागला आहे. वर्गातील मित्रांनी या विद्यार्थिनीला सिगरेट ओढताना पाहिलं. त्यांनी मुलीचा फोटो काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलगी मित्रांनी दिलेल्या या धमकीमुळे जास्तच घाबरली. घाबरलेल्या अवस्थेत तिने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिलिकॉन सिटी परिसरात राहणारी एक मुलगी शहरातील खासगी शाळेत ११ वीच्या वर्गात शिकत आहे. मुलीचे वडील डॉक्टर आहेत तर आई नर्सचं काम करते. सोमवारी संध्याकाळी मुलीचे आई वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तेव्हा छोटी बहीण आणि भाऊ दोघं बिल्डिंग खाली खेळत होते. त्यावेळी घरी एकटी असलेल्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. संध्याकाळी जेव्हा आई वडील घरी परतले तेव्हा मुलीला फासावर लटकलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला. आई वडील येईपर्यंत खूप उशीर झाला होता. तोवर मुलीचा जीव गेला होता.
आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी मुलीने वडिलांशी अखेरचा संवाद साधला होता. त्यात ती वडिलांना म्हणत होती की, एकेदिवशी शाळेतून सुटल्यानंतर मी मित्रांसोबत सिगरेट ओढली होती. त्यावेळी माझ्याचसोबत शिकणाऱ्या २ मुले आणि एका मुलीने त्यांच्या मोबाईलमध्ये माझा फोटो क्लिक केला. तो फोटो मला दाखवत ते तिघं मला ब्लेकमेलिंग करत होते. हा फोटो तुझ्या घरच्यांना पाठवू असं धमकावत होते. हे सगळं मुलीने वडिलांना सांगितले.
त्यानंतर वडिलांनी मुलीला तिच्या चुकीबद्दल माफ केले. परंतु विद्यार्थिनीच्या मनात एक भीती होती की, तिचे सहकारी मित्र सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल करतील. त्यामुळे ती तणावात गेली होती. अखेर मुलीने घरात एकटी असताना पंख्याला लटकून गळफास घेण्याचा निर्णय घेतला. त्यात या मुलीचा जीव गेला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस अधिकारी श्याम जोशी चौकशी करत आहेत. पोलिसांनी नातेवाईकांकडून तक्रार नोंदवून घेत पुढील कारवाई करत आहेत.