ठाणे: आइस्क्रीमचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करणाऱ्या भरतकुमार धनीराम कोरी (३०) या नराधमाला ठाणे जिल्हा व सत्र विशेष पॉक्सो कोर्टाचे न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी बुधवारी फाशीची सुनावली. ही घटना भिवंडीत २१ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती.
आरोपी भिवंडीतील रहिवासी आहे. तो पीडितेला ओळखत होता. त्याने तिला आइस्क्रीमचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केले. तिच्या डोक्यात मोठे दगड टाकून तिची हत्या केली होती. यात २५ साक्षीदार व पुरावे यांच्या आधारे कोर्टाने आरोपीला १८ एप्रिल रोजी दोषी ठरविले होते. बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले.
मुलांची साक्ष ठरली महत्त्वाची घटना घडली तेव्हा पीडित मुलीच्या दोन लहान भावांचे वय ९ आणि ५ वर्षे होते. आई-वडील खाणावळ चालवत. आरोपी त्यांच्याकडे जेवायला यायचा. त्याला घरातील सर्वजण ओळखायचे. त्याच्यासोबत पीडित मुलीला जाताना दोघा भावांनी शेवटचे बघितले होते. त्यांनी न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.