- नम्रता फडणीस
पुणे : कोथरूडसारख्या उच्चभ्रू सोसायटीतील विवाहित महिला आर्किटेक्ट पतीकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ तब्बल 25 वर्षांपासून सहन करीत होती. अखेर असहय झाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर अलंकार पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली.
विपीन इश्वरलाल बोरा (वय 48 रा. प्ल्लेडियम बिग बजार समोर कोथरूड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. एका 44 वर्षीय महिलेने पतीविरूद्ध अलंकार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला 24 वर्षे झाली आहेत. त्यांना 19 वर्षांची मुलगी आहे. मात्र लग्न झाल्यापासून पती पत्नीला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देत आहे.
पत्नीला इच्छेविरूद्ध गर्भपात करायला लावून अपमानित करून मानसिक त्रास देऊन अश्लील शिवीगाळ करणे, मुलीने पैसे मागितले असता तिला देखील मारहाण करून शिवीगाळ करणे असे आरोप पत्नीने पतीविरूद्ध केले आहेत. यातच पत्नीला लग्नात मिळालेले स्त्रीधन देण्यासही पती नकार देत आहे. घरखर्चास देखील पैसे देण्यास पतीकडून नकार दिला जातो. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडे पुढील तपास करीत आहेत.