नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेला दोन्ही कुटुंबांतून त्यांच्या लग्नाला झालेला विरोध कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे. तरुणाचे इतके प्रेम होते की, ती आपली नाही झाली तर कोणाचीही होऊ देणार नाही, अशी त्याची मानसिकता झाली होती. यातूनच तो तिचा गळा आवळत असताना ‘पिल्लू, फक्त दोन मिनिटे त्रास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू,’ अशी तिची समजूत काढताना मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेली ‘व्हाइस नोट’देखील आढळून आली आहे.
एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा गुन्हे शाखा पोलिसांनी केला आहे, तर तिच्या हत्येनंतर तरुणानेदेखील आत्महत्या केल्याने मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. कळंबोली येथील वैष्णवी बाबर (१९) व वैभव बुरुंगले (२४) यांच्या प्रेमाचा भयानक अंत पोलिसांनी उघडकीस आणला आहे. शेजारीच राहणाऱ्या दोघांमध्ये प्रेम होते. मात्र, कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. यातूनच १२ डिसेंबरला दोघांचा करुन अंत झाला.
कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या वैष्णवीचा शोध लागत नव्हता. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास सोपविण्यात आला होता. त्यासाठी सहायक आयुक्त मिलिंद वाघमारे, वरिष्ठ निरीक्षक अतुल अहेर यांनी सहायक निरीक्षक नीलम पवार यांचे पथक नेमले होते. त्यांनी वैष्णवीच्या सायन येथील कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली. ती एका तरुणासोबत रेल्वेने प्रवास करताना सीसीटीव्हीत दिसली. तर खारघर स्थानकात उतरून टेकडीच्या दिशेने गेली. काही वेळाने तरुण एकटाच परत आल्याचे सीसीटीव्हीत दिसले. जुईनगर स्थानकात १२ डिसेंबरलाच आत्महत्या केलेला वैभव बुरुंगले हा तरुण ‘तोच’ असल्याचे समोर आले.