बहराइच – उत्तर प्रदेशातील बहराइच इथं एका मुलीचं तिच्या केसात लावलेल्या पिननं जीव वाचवला आहे. शाळेत जाणाऱ्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी केसातील पिन काढून विद्यार्थिनीने तिचा बचाव केला. अपहरणकर्त्यांना पिन टोचल्यानंतर त्यांचा हात सुटला त्यानंतर मुलीने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा आसपासचे लोक धावत तिच्याकडे आले.
सोमवारी सकाळी चौथीच्या वर्गातील मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु शाळकरी मुलीनं प्रसंगावधान राखत अपहरणकर्त्याच्या हातातून निसटण्यात यश मिळवलं. तिने केसातील पिन काढली आणि ती अपहरणकर्त्यांच्या हातावर टोचली. त्यानंतर त्यांचा हातातून निसटताच मुलीने जोरात आरडाओरड सुरू केली. तेव्हा आसपासची लोकं धावत येत असल्याचं पाहून अपहरणकर्ते धूम ठोकून पळून गेले.घडलेल्या प्रकारानंतर विद्यालयाच्या शिक्षिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत मुलांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी स्थानिक लोकांशी घटनेबाबत चौकशी केली.
काय आहे प्रकार?
बहराइच जिल्ह्यातील नगर कोतवाली परिसरात अकबरपुरा प्राथमिक विद्यालयातील चौथीत शिकणारी विद्यार्थी सकाळी ७.३५ च्या सुमारात घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली. त्यावेळी रस्त्यात काँग्रेस भवनाजवळ एका अज्ञात अपहरणकर्त्याने मुलीला गाठलं. अपहरणकर्त्याने मुलीला खेचत त्याच्यासोबत घेऊ जाऊ लागला. त्यावेळी धाडसी मुलीनं प्रसंगावधान राखत केसातील पिन काढून त्याच्या हाताला टोचली. तेव्हा अपहरणकर्त्याचा हात सुटला. त्यानंतर तिने जोरात ओरडण्यास सुरुवात केली. हाताला पिन टोचल्यानं अपहरणकर्त्याला वेदना होऊ लागल्या. त्यात मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तो तिथून फरार झाला. मुलीचा आवाज ऐकून आसपासची लोकं तिच्याजवळ पोहचले.
या घटनेनं शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शाळेच्या शिक्षिकांनी घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी योग्य ती पाऊलं उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही अपहरणाची घटना नसून परिसरात राहणाऱ्या एका मानसिक व्यक्तीने मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने विट उचल्यावर तो तिथून पळाला. पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो कुठेही सापडला नाही.