उस्मानाबाद : तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला एक अख्खा तीर्थकुंडच काहींनी हडप करून त्यावर खासगी बांधकाम सुरू केले होते. याची माहिती कळताच चौकशी लावण्यात आली होती. त्यात बनवेगिरीने हा तीर्थकुंड खासगी व्यक्तीच्या नावे झाल्याचे निष्पन्न होताच सहभागी सर्वांवर फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.तुळजापुरात अनेक प्राचीन स्थळे असून कालौघात ती नष्ट होत आहेत. मंकावती तीर्थकुंड हे त्यापैकीच एक. काही स्थानिक लोकांनी बनवेगिरी करीत ते आपल्या मालकीचे असल्याचे भासवून नावावर केले. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी चौकशी सुरू केली. तहसीलदार व पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी तपासणी केली असता तीर्थकुंडावर पालिकेची मालकी असल्याचे दिसून आले. तसा अहवाल त्यांनी सादर केला. यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच हा तीर्थकुंड लगेच मूळ आखीव पत्रिकेच्या आधारे शासन खाती नोंद घ्यावी व ते जमा करून घ्यावे.
तर होणार गुन्हे दाखल जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ असलेली स्थळे आहेत, अशी स्थळे कोणी खासगी व्यक्तींनी हडपली असल्यास नागरिकांनी त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी, हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. यामुळे धाबे दणाणले आहे.