पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरे याच्या मेहुण्याचा मित्र रोहित रेगे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध नसल्याची दावा बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी शुक्रवारी केला. गुजरात फॉरेंसिक लॅबने बंदुकीबाबत दिलेला बॅलेस्टिक रिपोर्ट नकारात्मक असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपीने अंदुरेकडे ७.६५ मिमी बोअरचे पिस्तुल, तीन जीवंत काडतुसे दिले होते. अंदुरे याने ११ आॅगस्टला त्याच्याकडील पिस्तुल मेव्हुणा शुभम सूर्यकांत सुरळेकडे दिले.अंदुरेच्या अटकेचे वृत्त समजताच शुभमने ते पिस्तुल चुलत भाऊ अजिंक्य शशिकांत सुरळेकडे सोपविले. शुभमच्या सांगण्यावरुन ते रोहित रेगेकडे लपवण्यासाठी देण्यात आले. सदर पिस्टल सीबीआयने आॅगस्ट २०१८ मध्ये औरंगाबाद येथून जप्त केले होते. त्यानंतर ते गुजरात येथील फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल नुकताच सीबीआयला प्राप्त झाला असून हा अहवाल नकारात्मक आहे. सीबीआय केवळ काय तपास केला हे सांगत आहे. मात्र पिस्तुलच्या तपासात काय निष्पन्न झाले हे ते सांगत नसल्याचा युक्तिवाद अॅड. चंडेल यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.सय्यद यांच्या न्यायालयात शुक्रवारी केला. दोषारोपपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयास नाही. त्याबाबत मद्रास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देण्यात आले. दोषारोपपत्र दाखल करण्यास वाढ हवी असेल तर तपास पूर्ण का झाला नाही?, सरकारी वकीलांचा अहवाल तसेच खटल्यातील महत्वांच्या मुद्यांवर काय तपास झाला?, अजून कोणत्या मुद्यांवर तपास करावयाचा आहे?, आरोपीला कारागृहात का ठेवयाचे आहे? या सर्व गोष्टी सीबीआयने स्पष्ट करणे गरजेचे होते. परंतु सीबीआयने सादर केलेला अहवालतून ठोस काही निष्पन्न होत नाही, असा युक्तिवाद अॅड.चंडेल आणि अॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला. सीबीआयचे वकील पी. राजू म्हणाले, रेगे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात वापर असल्याचा दावा आम्ही कधी केलेला नाही. अमोल काळे याला गौरी लंकेश खून प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची डॉ. दाभोलकर प्रकरणातील भूमिका स्पष्ट झाली आहे. .....................तपासात काय प्रगती हे स्पष्ट करावे मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा सुरुवातीला सीबीआयने केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले हे अद्याप सीबीआयने स्पष्ट केले नाही. तपासात सीबीआयने नेमकी काय प्रगती केली हे सांगितले नाही. त्यांनी विरेंद्र तावडेंवर जे आरोपपत्र दाखल झाले त्याच आरोपपत्रातील मुद्दे पुन्हा मांडून ९० दिवसांची वाढ मागितली आहे. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात येऊ नये असे अॅड. पुनावळेकर म्हणाले.
रोहित रेगेकडून जप्त केलेल्या पिस्तुलचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध नाही : बचाव पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 7:44 PM
सदर पिस्टल सीबीआयने आॅगस्ट २०१८ मध्ये औरंगाबाद येथून जप्त केले होते. त्यानंतर ते गुजरात येथील फॉरेंसिक लॅबमध्ये तपासणीकरीता पाठविण्यात आले होते.
ठळक मुद्देगुजरात फॉरेंसिक लॅबने दिला बॅलेस्टिक रिपोर्ट याबाबतचा अहवाल नुकताच सीबीआयला प्राप्त झाला असून हा अहवाल नकारात्मक